इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले २ सख्खे भाऊ पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरात रविवारी घडली आहे. पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे रा. आवळखेड असे बुडालेल्या युवकांची नावे आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीसांनी कसारा येथील आपत्ती टीमला घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या युवकांना शोधण्याचे काम सुरु होते. या दुर्देवी घटनेमुळे आवळखेड गावावर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी आवळखेड येथील काही युव दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र भावाला वाचवत काठावर आणीत असतांना अचानक दोघेही पुन्हा पाण्यात पडल्याने बुडाले. या युवकांना शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व पोलीसांनी प्रयत्न केले मात्र ते मिळुन आले नाही.