नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरोडा आणि शस्त्र विरोधी पथकाने सापळा रचून पंचवटी परिसरात प्राणघातक असलेले कोयते आणि चॉपर घेऊन येणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चार कोयते आणि एक चॉपर जप्त करण्यात आला आहे. या संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशवाडी उद्यान येथे हा सापळा रचण्यात आला होता. त्यात संशयित अंकुश मोतीराम जाधव २० रा. शेरेमळा झोपडपट्टी, पंचवटी नाशिक, श्रीकांत सुरेश मुकणे १९ रा. शेरेमळा झोपडपट्टी, पंचवटी नाशिक हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून चार धारदार लोखंडी कोयते आणि एक चॉपर जप्त करण्यात आले.
बुधवार दरोडा आणि शस्त्र विरोधी पथकातील सपोनि किरण रोंदळे आणि त्यांच्या पथकास गणेशवाडी परिसरात काही संशयित प्राणघातक हत्यारे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलीस उपायुक्त (गुन्हे), प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सपोनि किरण रोंदळे सपोउनि प्रेमचंद गांगुर्डे.पोहवा विजयकुमार सुर्यवंशी, भाऊसाहेब क्षिरसागर, शेख कादीर, श्रीशैल सवळी, कडूबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रविण चव्हाण, विशाल जोशी, महेश खांडबहाले, मपोअं. मनिषा मल्लाह यांनी ही कारवाई केली.