नाशिक : सात महिने उलटूनही सोन्याची पोत देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी सराफ विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष प्रभाकर बेदरकर (रा.काजीपुरा चौकी मागे,जुनेनाशिक) असे फसवणुक करणा-या संशयित सराफाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकृष्ण माधवराव कोरडे (रा.हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. बेदरकर याची काजीपुरा पोलिस चौकी मागे संतोष ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. कोरडे दांम्पत्याचे या भागात येणे जाणे असल्याने त्यांनी ब-याच सोन्याच्या वस्तू बेदरकर यांच्या कडून बनविल्या आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात कोरडे यांच्या पत्नीने ज्वेलरी पेढीत जावून किरकोळ दागिणे मोडून एकच वजनी सोन्याची पोत बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ जानेवारी रोजी चार तोळे वजनाची पोत बनविण्यासाठी अंगावरील सुमारे २१.०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे किरकोळ दागिणे काढून दिले. तसेच फोन पे द्वारे ७० हजाराची रोकड दिली. मात्र सहा – सात महिने उलटूनही बेदरकर यांनी सुमारे १ लाख ६८ हजार ७०० रूपये किमतीची सोन्याची पोत दिली नाही. कोरडे यांनी तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडकर करीत आहेत.