नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीस धमकावून घेतलेले विवस्त्र छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करणा-यविरुध्द देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितीच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने गेल्या महिन्यात स्नॅप चॅटचे अकाऊट आपल्या मोबाईल मध्ये सुरू केले होते. शाळेतील मुलामुलींशी ती संपर्कात असतांना ७२१८९९०६१९ या क्रमांकावरून तिला फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. कुणी तरी मैत्रीण असेल या भावनेतून तिने रिक्वेस्ट स्विकारत चॅटींग केली असता ही घटना घडली. कालांतराने या नंबरधारकाने मुलीस धमकावून तिला अश्लिल छायाचित्र काढण्यास व ते स्नॅप चॅटवरून सेंड करण्यास भाग पाडले. मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत संशयिताने सदरचे फोटो व व्हिडीओ स्नॅप चॅट आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत संशयिताविरोधात विनयभंग, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि बाललैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक जाधव करीत आहेत.