नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा दारू विक्रेत्यांवर वेगवेगळ्या भागात छापे टाकून मंगळवारी तिघा विक्रेत्यांविरुध्द पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या संशयितांच्या ताब्यातून सुमारे पाच हजार रूपये किमतीचा देशी विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड,नाशिकरोड व इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंबड औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात सुनिता अरूण पवार (रा.घर नं.२-२९० कोळीवाडा) ही महिला बेकायदा मद्यविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला असता ती मद्यविक्री करतांना मिळून आली. महिलेच्या घरात प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्यांचा सुमारे २ हजार ३१० रूपये किमतीचा बॉक्स मिळून आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी कारवाई मलधक्का भागात करण्यात आली. सागर केवलराम आसवानी (३१ रा.गुलाबवाडी) हा युवक मंगळवारी रात्री मालधक्का परिसरातील रेल्वे गेट कडे जामाºया मार्गावरील पत्र्याच्या शेडच्या बाजूला दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे ७७० रूपये किमतीच्या देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक गावले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत. तर शेख महेबुब शेख बाबामीया (३३ रा.गणेशनगर,वडाळागाव) हा संशयित वडाळागावातील रामोशीवाडा येथे मद्यविक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून १ हजार ७२० रूपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक भोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.