गांजा विक्री करणा-या मुंबईच्या विक्रेत्यास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवाजीरोडवरील नेपाळी कॉर्नर भागात भांग या अमली पदार्थाची विक्री करणा-या मुंबईच्या विक्रेत्यास पोलिसांनी गजाआड केले आहे.संशयिताच्या ताब्यातून सुमारे १ हजार ६०० रूपये किमतीची व चार किलो वजनाची भांग जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनजीत सुखदेव शर्मा (४४ रा.साईलिला सोसा.नेरूळ मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मुंबईचा इसम भांगविक्रीसाठी भद्रकाली भागात नियमीत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.८) रात्री तो पोलिसांच्या जाळयात अडकला. नेपाळी कॉर्नर येथील म्हसोबा मंदिराच्या आडोशाला तो चोरीछुपी भांग विक्री करीत होता. संशयिताच्या ताब्यातील पिशवीत सुमारे १ हजार ६०० रूपये किमतीची उग्रवास करणारी ओली भांग मिळून आली. याबाबत पोलिस शिपाई निकुंभ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक कोळी करीत आहेत.
बसप्रवासात युवतीचा आयफोन चोरट्यांनी केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बसप्रवासात युवतीचा आयफोन हातोहात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. पुणे ते नाशिक प्रवासात मंगळवारी रात्री ही घटना घडली. या चोरीप्रकरणी प्रितम गोकूळ आवारे (रा.पोलिस हेडकॉर्टर,गंगापूररोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवारे या पुणे येथे गेल्या होत्या. मंगळवारी रात्री नारायण गाव येथून त्या बसने नाशिकला पोहचल्या. बसप्रवासात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवलेला सुमारे ३५ हजार रूपये किमतीचा आयफोन चोरून नेला. ही घटना ठक्कर बाजार बसस्थानकात उतरल्यानंतर निदर्शनास आली. अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.