भट्टीवरील ड्रमचा स्फोट झाल्याने गंभीर भाजलेल्या ३५ वर्षीय कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील ग्राफाईट कंपनीत भट्टीवरील ड्रमचा स्फोट झाल्याने गंभीर भाजलेल्या ३५ वर्षीय कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गेल्या महिन्यात झाला होता. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जहीर जाकीर हुसेन (रा.भवरमळा,श्रमिकनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. जहिर हुसेन सातपूर औद्योगीक वसाहतीतील ग्राईड कंपनीत नोकरीस होता. गेल्या ११ जानेवारी रोजी तो कंपनीतील भट्टीवर काम करीत असतांना ही घटना घडली होती. भट्टीवरील ड्रमचा अचानक स्फोट झाल्याने ही घटना घडली होती. या घटनेत चेह-यासह त्याचा डोक्याचा भाग भाजला होता. गंभीर अवस्थेत त्यास श्री गुरूजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. सुमारे महिनाभर त्याच्यावर उपचार सुरू होता. बुधवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत डॉ.सुजित मांडगे यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड भागात फोनवर बोलत रस्त्याने पायी चालणा-या व्यक्तीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी लंपास केला. या चोरीप्रकरणी भागवत भाऊराव गाडेकर (४४ रा.वसंतस्मृती सोसा.पाटील लेन) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गाडेकर गेल्या शनिवारी (दि.४) रात्री आपल्या घरपरिसरात फोनवर बोलत फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. मॅग्नम हॉस्पिटल समोरून ते फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांपैकी एकाने त्यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.