भगूर येथे घरमालक दांम्पत्यास भाडेकरूंनी केली मारहाण
नाशिक : वेळेवर भाडे मिळत नसल्याने घरमालकांने घर खाली करण्यास सांगितल्यामुळे भगूर येथे घरमालक दांम्पत्यास भाडेकरूंनी मारहाण केली. या घटनेत घरमालक असलेले दांम्पत्य जखमी झाले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेनिफर पिटर कॉक्स (३२) व सॅम डिसुझा (२७ रा.दोघे हरिस्पर्श सोसा.बार्नस स्कुल रोड भगूर) असे घरमालकास मारहाण करणा-या संशयित भाडेकरूंची नावे आहेत. याप्रकरणी जल्पेश नारायणदास आशर (रा.माजीवाडा,ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. जल्पेश व शालिनी आशर हे दांम्पत्य गेल्या शुक्रवारी (दि.१) हरिस्पर्श सोसायटीतील भाडेतत्वावर दिलेल्या सदनिकेचे भाडे घेण्यासाठी शहरात आले होते. दरमहा ठरलेले भाडे भाडेकरूकडून वेळेवर मिळत नसल्याने त्यांनी संशयितांना जाब विचारत घर खाली करण्याचा सल्ला दिला असता ही घटना घडली. संतप्त दोघांनी आशर दांम्पत्यास शिवीगाळ करीत भाडेही नाही देत आणि घरही खाली करत नाही असे म्हणत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत आशर दांम्पत्य जखमी झाले असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.
१९ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक : जेलरोड भागात राहणा-या १९ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिलक अनिल जाधव (रा.जय रघूवीर सोसा.आयोध्यानगर,पंचक) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. जाधव याने शुक्रवारी (दि.१५) आपल्या राहत्या घरातील किचन मध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत दिपक जाधव यांनी खबर दिल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.