नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंदी असलेल्या विदेशी ई सिगारेट विक्री करणा-या दोघांवर कारवाईत करत पोलिसांनी फ्लेवरची निकोटीन युक्त सुमारे ८७ हजार ९०० रूपये किमतीचे सिगारेटची बॉक्स जप्त केली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेश रामधनी पाल (२८ रा.वरद विनायक अपा.श्रमिकनगर,सातपूर) व फैसल अब्दूलबारी शेख (२८ रा.विशालदिप सोसा.नाशिक हॉस्पिटल जवळ भाभानगर) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित सिगारेट विक्रेत्यांची नावे आहेत.
कॉलेजरोड भागात या सिगारेटची राजरोस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी युनिट १ च्या पथकाने होलमार्क चौकात सापळा लावला असता सिगारेट विक्री करणारी संशयित दुकली पोलिसांच्या हाती लागली. दुचाकी पार्क करून ते तरूणांना गाठत सिगारेट खरेदीबाबत विचारपूस करीत असतांना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातील बॅगेत विविध फ्लेवर आणि कंपनीचे सुमारे ८७ हजार ९०० रूपये किमतीचे विदेशी सिगारेटचे पाकिटे असलेली बॉक्स मिळून आले. याबाबत युनिटचे अंमलदार मुक्तार निहाल शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन,आयात निर्यात वाहतूक विक्री साठवणुक व जाहिरात) प्रतिबंध अधिनियम सन.२०१९ चे उलंघन कलम ३,४,७ सह सिगारेट व तंबाखू उत्पादने सुधिरीत अधिनियम २०१८ चे कलम ७ प्रमाणे गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.