नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावर सिटी लिंक बसमधून प्रवास करणा-या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमलकुमार प्रभूलाल सानिक (४७ रा.हरिओमनगररोड,आर्टीलरीरोड ना.रोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिला शुक्रवारी (दि.३) बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकात जात असतांना ही घटना घडली. सिटीलिंक बसमधून (एमएच १५ जीव्ही ८०७४) ती नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना शेजारी बसलेल्या संशयिताने तिचा विनयभंग केला. प्रारंभी महिलेने त्याकडे कानाडोळा केला मात्र नाशिक पुणे मार्गावरील बिर्ला हॉस्पिटल भागात संशयिताने अतिरेक केला. प्रवास्यांनी भरलेल्या बसमध्येच महिलेने संशयितास जाब विचारल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत.