नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील संजीव नगर भागात पानस्टॉलमध्ये राजरोसपणे गुटखा विक्री करणा-या परप्रांतीयासह त्यास माल पुरविणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अतहर वाहिद अली हुसैन (३० मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली संजीवनगर,अंबड),अब्दूल रहिम अब्दूल कय्युम चौधरी (३८ रा.सुलतान चौक समोर,संजीवनगर) व मोहम्मद जाबीर मुस्ताक खान (२७ रा.संभाजी चौक,विराटनगर अंबड लिंकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसैन याचे संजीवनगर भागात आझाद पान शॉप नावाचे पानस्टॉल आहे. संशयित गुटखा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२) पोलीसांनी छापा टाकत पानस्टॉलची तपासणी केली असता त्यात विविध प्रकारचा सुमारे २ हजार ३९३ रूपयांचा बंदी असलेला गुटख्याचा साठा मिळून आला. चौकशीत हा माल उर्वरीत दोघा संशयिताकडून खरेदी करण्यात आल्याचे समोर आल्याने दोघा वितरकांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी पोलिस शिपाई प्रविण राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.