नाशिक – येवला तालुक्यात अफगाणी सुफी धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्तीच्या हत्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले आहे. या चौघा संशयितांना बदलापूरमध्ये पकडण्यात आले. यामध्ये गणेश उर्फ देवा झिंजाड-पाटील (वय २८ जि. अहमदनगर), बाबाचा कार चालक रवींद्र तोरे (वय २५, जि. अहमदनगर), पवन आहेर (वय २६, रा. येवला) आणि गफार अहमद खान असे या चौघास संशयितांची नावे आहे. दरम्यान या घटनेतील दोन संशयित अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्या दोघांचा शोध सुरू आहे. फरार असलेल्या दोघा साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात यश येईल असं नाशिकचे ग्रामीण अधीक्षक सचिन पाटील यांनी म्हटलं आहे.
मालमत्तेच्या हव्यासापोटी हा कट तडीस नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ड्रायव्हर आणि त्यांच्या काही विश्वासू सेवेकरी अशा चौघांनी मिळून त्यांच्या हत्येचा कट रचला. चिश्ती बाबांची पत्नी गरोदर असल्याने बाळाच्या जन्मानंतर बाबा संपत्तीचा वारस त्या बाळाला करतील अशी भीती संशितांना असल्याने त्यांनी बाबांची हत्या केल्याचा संशय नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तीन कोटी रुपयांची मालमत्ता
जरीफ चिस्ती हे निर्वासित म्हणून भारतात वास्तव्य करत होते. दरम्यान युट्यूब चॅनल जरीफ बाबांच्या कमाईचे मोठे साधन होते. युट्युबवर जरीफ बाबांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यामुळे युट्युबकडून त्यांना रक्कम आणि काही देणगी दिली जायची. या माध्यमातून त्यांनी तीन कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली होती. मात्र निर्वासित असल्याने त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांचे विश्वासातील सेवेकरी, स्थानिक नागरिकांच्या नावावर करण्यात येत होते.