नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी इंदिरानगर व उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना इंगळेनगर भागात घडली. स्वप्निल सिताराम मोरे (३६ रा.मंजूळा हाईटस,इंगळेनगर) या युवकाने आपल्या राहत्या घरी इलेक्ट्रीक वायर पंख्यास बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैदयकिय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत. दुस-या घटनेत अल्फिया इब्राहिम पिंजारी (१७ रा.मुमताजनगर वडाळागाव) या युवतीने गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील माळयावर लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. मंजूर मन्सूरी यांनी खबर दिली. तिसरी घटना पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर भागात घडली. कविता शरद धंदर (३५ रा.सिध्दीविनायक संकुल,म्हाडा कॉलनीजवळ) या महिलेने दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत विजय शिरसाठ यांनी खबर दिली. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृ्त्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार खरोटे व जमादार पाळदे करीत आहेत.