नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काठे गल्ली परिसरात महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. विकी शांताराम जावरे (३१ रा.संत गाडगे महाराज वसाहती,भिमशक्तीनगर आगरटाकळी), सुमित मिलींद पगारे (२६ रा.धम्मनगर,जुना कथडा जाकिर हुसेन हॉस्पिटल जवळ) व मंदार उर्फ निलेश कृष्णनगर पवार (२० रा.तपोवन सोसा.आठवण लॉन्स समोर तपोवन) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासात तिघा संशयिताना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिस शिपाई दयानंद सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि.३१) मध्यरात्री ही घटना घडली होती. संशयितांनी हातात लाठ्या काठ्या घेवून दहशत माजवित काठे गल्लीत उभ्या असलेल्या एमएच ०४ जी यू ८३२४,एमएच ४८ पी ०७१६,एमएच १५ जीए ५५१० व एमएच १५ डीएस २८०५ आदी वाहनांची तोडफोड करीत शंकरनगर भागात कृपा निवास या घरावर दगडफेक केली होती. घरातील संगीता शेळके यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.