नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगर टाकळी येथे बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन घेण्यात आल्यामुळे मासेविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या ताब्यातून सुमारे १८ हजार रूपये किमतीचे ३०० किलो मासे जप्त करण्यात आले आहेत. मत्सव्यवसाय विभागाने हा छापा टाकला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर आडणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मासे विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी मत्सव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद लहारे यांनी तक्रार दाखल केली आहे. मांगूर हा विदेशी मासा असून तो अति मांसाहारी आहे. पाण्यातील स्थानिक मासे तो नष्ट करतो त्यामुळे नैसर्गिक जैवविविधतेवर त्याचा परिणाम होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते या पार्श्वभूमीवर या विदेशी माशांची वाहतूक, विक्री व संवर्धनास बंदी घालण्यात आली आहे. आगर टाकळी येथील एक मासेविक्रेता आपल्या राहत्या घरात या माशांचे संवर्धन करीत असल्याची माहिती मत्सव्यवसाय विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता घरामध्ये बनविण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात २०० ते ३०० किलो हा मासा आढळून आले. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.