नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामवाडी भागात पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून पोबारा केल्याची घटना घडली. ईश्वर राजेंद्र गुरगुडे (रा.सितळा देवी मंदिराजवळ,रामवाडी) असे पैसे घेवून पसार होणा-या संशयित कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पंपव्यवस्थापक शिवाजी खेडकर यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रामवाडी भागातील गोदावरी पेट्रोल पंपावरील कामगार आहे. गेल्या १३ डिसेंबर रोजी ही घटना घडली. सकाळच्या सुमारास संशयित नेहमीप्रमाणे पेट्रोलपंपावर कामावर आला होता. दुपारच्या सुमारास तो जेवणाचा डबा घेण्यास गेला तो पुन्हा परतला नाही. संशयिताच्या ताब्यात ५० हजार ६१० रूपयांची रोकड होती. बराचवेळ उलटूनही न परतल्याने खेडकर यांनी संपर्क साधला असता घरी नसल्याचे सांगण्यात आले होते. पंपमालक नरेश गजभिये यांची परवानगी न घेता संशयिताने रकमेचा अपहार केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक धनश्री पाटील करीत आहेत.