नाशिक : ११ वर्षीय शाळकरी मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वृध्द टेलरला न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास आणि सात हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१८ मध्ये लोहणेर ता. देवळा येथे शाळेचे फाटके दप्तर शिलाईसाठी घेवून गेलेल्या या शाळकरी मुलीचा लैगिंग छळ करण्यात आला होता. रोडू भागा वाघ (६१ रा. कुंभारवाडा,लोहणेर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. डी.डी.देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
संशयिताचा कपडे शिवण्याचा व्यवसाय असून राहत्या घरातच त्याचे दुकान आहे. पीडिताच्या कुटुंबियाशी संशयिताचे सलोख्याचे संबध असल्याने गावातील इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारी ११ वर्षीय पीडित मुलगी २१ ऑक्टोबर २०१८ रोजी त्याच्या दुकानात शाळेचे फाटलेले दप्तर शिवण्यासाठी गेली असता ही घटना घडली होती. चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत संशयिताने तिला आपल्या दुकान वजा घरात बोलावले. संशयित परिचीत असल्याने पीडिता घरात गेली असता त्याने लैंगिक छळ करून बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने वाच्यता केल्यास जीवे मारण्याची तसेच दुकानापाठीमागील पडीक जागेत पुरून टाकण्याची धमकी दिली होती. भेदरलेल्या मुलीने कसेबसे घर गाठून आपल्या आईकडे आपबिती कथन केल्याने या घटनेचा उलगडा झाला होता. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून याबाबत देवळा पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालिन उपनिरीक्षक साबळे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयास सादर केले. या खटल्यात विशेष सरकारी वकिल अॅड.दिपशिखा भिडे यांनी आठ साक्षीदार तपासले असता, फिर्यादी,साक्षीदार व पंचानी दिलेल्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस लैंगिक छळ प्रकरणात दोषी ठरवून त्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.