नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहे. या मुलींचे अपहरण केल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी वर्तविला आहे. त्यात दोघा संख्या बहिणींचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हसरूळ राजबिहारी लिंकरोड वरील माणेनगर भागात राहणारी १३ वर्षीय मुलगी सोमवारी बेपत्ता झाली आहे. तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत. दुसरी घटना सामनगावरोडवरील चाडेगाव फाटा भागात घडली. रविवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास आपल्या घरासमोर खेळणा-या अनुक्रमे दहा व सहा वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा आरोप त्यांच्या आईने केला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.