बेकायदा मद्यविक्री करणा-यावर पोलिसांची कारवाई; दहा हजाराचा देशी दारूचा साठा हस्तगत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्यविक्री करणा-यावर पोलिसांनी कारवाई करुन दहा हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे. मंगेश केशव कोतकर (रा.कारगिल चौक,दत्तनगर) असे संशयित मद्यविक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तनगर भागातील आंबेडकर चौकात राजरोसपणे बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला असता संशयित मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे दहा हजार ८०० रूपये किमतीचा प्रिन्स संत्रा नावाचे देशी दारूचे बॉक्स हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई प्रविण राठोड यानी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास हवालदार प्रशांत सोनार करीत आहेत.
३१ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३१ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना डावखरवाडी भागात घडली. सागर शिवाजी साळवे (रा.व्हॅली गार्डन,के.जी.मेहता रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. साळवे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साळवे याने मंगळवारी (दि. ३१) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.