नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नगरसेवक पुतण्यांनी महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी वंदना रमेश गोलाईत (५५ रा.दसक,जेलरोड) या महिलेने तक्रार दाखल केली असून त्यात भाडे करार संपल्याने जागा खाली करण्याबाबत सांगण्यास गेल्यावर ही धमकी दिल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरुन शुभम उर्फ विकी सुरेश निमसे, सुरेश कारभारी निमसे, सनी चंद्रकांत निमसे व चंद्रकांत कारभारी निमसे (रा.सर्व निमसे मळा,नांदूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोलाईत यांची महानगरपालिका हद्दीतील मौजे नांदूर – दसक गावच्या शिवारातील सर्व्हे नं. १४९ मध्ये १ हेक्टर ३१ आर पैकी १५ आर मिळकत मालकीची आहे. त्यातील पाच आर जागा त्यांनी संशयित शुभम उर्फ विकी निमसे यास १ ऑगष्ट २०२० ते ३० जून २०२१ या काळात भाडेतत्वावर दिलेली होती. त्यापोटी ४० हजाराचे भाडे व तेवढेच डिपॉझिट घेण्यात आलेले होते. हा करार संपल्यानंतर पुन्हा विनंतीवरून एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता. मात्र सहा महिन्यांपूर्वी मुदत संपूनही संशयितांनी जागा खाली केली नाही व भाडेही दिले नाही त्यामुळे गोलाईत यांनी संशयितांची भेट घेतली असता ही घटना घडली. महिलेने नुकतीच आपल्या मुलांना सोबत घेवून संशयितांची भेट घेतली असता तिघा संशयितांनी शिवीगाळ करीत जागा खाली करणार नाही. ही जागा तुमची नाही येथे आलात तर तुमचे हात पाय तोडू तसेच महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांना सांगून तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिली. यावेळी संशयितांनी आमचे चुलते नगरसेवक आहेत तुम्ही आमचे काही करू शकत नाही असेही तक्रारीत म्हटले असून या भूखंडावरून संशयितांनी पत्र्याचे शेड चोरून नेल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.