नाशिक : मुंबईनाका भागात लॉजिंगमध्ये थांबलेल्या अहमदनगर जिह्यातील एका प्रवासी तरूणाने स्व:तास पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेत मृताची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून त्याने कुटूंबियांसाठी काही करता येत नसल्याची खंत व्यक्त केल्याचे नमुद केले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तौसिफ हबीब पठाण (३५, रा. दंडवते वस्ती साकोरी शिर्डी रोड ता. राहता) असे मृत युवकाचे नाव आहे. पठाण मंगळवारी (दि.१२) शहरात दाखल झाला होता. मुबईनाका परिसरातील कालिका मंदिर भागात रात्री हॉटेल हॅपी टाईम गाठून त्याने मुक्कामी राहण्यासाठी रूम बुक केली यावेळी त्याने तीन ते चार दिवसांसाठी रूम बुक केल्याने व्यवस्थापनाने लॉजिंगमधील रूम नं.१०२ चा ताबा दिला होता. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर गुरूवारी (दि.१४) अचानक त्याच्या रूममधून धूर निघू लागल्याने व्यवस्थापनाने अग्निशमन दलास पाचारण करीत दरवाजा तोडला असता त्याने पेटवून घेतल्याचा प्रकार समोर आला. बेडसह तो मृावस्थेत जळालेला मिळून आला. पोलिसांच्या तपासात तौसिफ हा घरातून न सांगता नाशिकला आला होता. आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीवरून आईवडिलांसाठी काही करता न आल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक संतोष जोपळे यांनी दिलेल्या खबरीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक डी.व्ही.शेळके करीत आहेत.