नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उल्हासनगर येथील पोलिसांनी सराफ व्यावसायिक दीपक कमलाकर दुसाने यांच्यावर चोरीचे सोने घेतल्याचा आरोप केल्यामुळे त्यांनी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनने परिसरात खळबळ माजली आहे. दीपक दुसाने यांचे परिसरातील देवी चौकात दुसाने बंधु नावाने दुकान आहे. या घटनेचे वृत्त समजात त्यांचे नातेवाईक, मित्र व सराफी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिटको हॉस्पिटल येथे धाव घेतली.
यावेळी पोलिसांनी वारंवार चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करत त्रास दिल्याने दीपकने राहत्या घरी आत्महत्या केली अशी माहिती मृत दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसाने पुढे म्हणाले की, २३ तारखेला दीपक यांच्या दुकानात ठाणे येथून पोलिस आले व त्यांनी दीपक यांच्यावर चोरीचे सोने घेतल्याचा आरोप केला. व त्याची भरपाई म्हणून २ लाख ९० हजार रोख तर १२ ग्रॅम सोन्याची मागणी केली. मात्र हे पैसे त्यांनी दुकानात न घेता परिसरातील बिटको पॉईंट येथे घेतले व कुठल्याही प्रकारचे लेखी कागदपत्र दिले नाहीत. त्यांच्या या जाचाला कंटाळून माझ्या पुतण्याने आत्महत्या केली. त्यामुळे संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी केली आहे.