नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामनगाव रोडवरील आसवणी कॉलनी भागात गावठी कट्टा घेवून फिरणा-या तरुणांवर पोलिसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातून ३० हजार रूपये किमतीचा पिस्तूल हस्तगत केली आहे. गुड्या उर्फ आतिष शांताराम चौधरी (३१ रा.आसवणी कॉलनी,सामनगावरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२७) नाशिकरोड पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आला. संशयिताने तो कोठून व कशासाठी आणला याबाबत पोलिस चौकशी करीत असून याबाबत अंमलदार अजय देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत.