भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : औरंगाबदरोडवरील जनार्दन स्वामी मठ भागात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. मंगेश विश्वनाथ बर्वे (३९ रा.ओमकार व्हिला,चाणक्यपुरी म्हसरूळ लिंक रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. बर्वे गेल्या सोमवारी (दि.४) रात्री पंचवटी कडून आपल्या दुचाकीवर नांदूरनाक्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. जनार्दन स्वामी मठ परिसरातून ते प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या घटनेत बर्वे गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यास तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गेले नऊ दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.१३) रात्री उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.
३० वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक : ३० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उपनगर भागात घडली. गंगासागर रामबुजारथ भारती (रा.रघूविर कॉलनी) असे मृत तरूणाचे नाव आहे. भारती याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारती याने गुरूवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या खोलीत पंख्यास ब्लँकेटच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत भाऊ विश्वंभर भारती यांनी खबर दिल्याने उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.