नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोटारसायकली चोरणा-या दोन जणांना पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्याकडून तीन मोटारसायकल हस्तगत केल्या आहे. चोरी करणा-यांमध्ये एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम राजेंद्र सासे (२२ रा.घर नं.३९९२ वीर सावरकर चौक भोई गल्ली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. काझीपुरा येथील साजिदअली सिराजअली जागीरदार (रा.अहमदशहा चौक) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफडब्ल्यू ५७३१ गेल्या मंगळवारी (दि.२४) रात्री चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस चोरट्यांचा माग काढत असतांनाच गुन्हे शोध पथकाचे सागर निकुंभ व धनंजय हासे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. खब-याने दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने संशयित सासे यास ताब्यात घेतले असता त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने भद्रकाली व मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. सदर बालकाकडे याबाबत चौकशी केली असता संशयितांनी लपविलेल्या तीन मोटारसायकली काढून दिल्या. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी,पोलिस नाईक रमेश कोळी,लक्ष्मण ठेपणे,शामकांत पाटील,अंमलदार सागर निकुंभ,धनंजय हासे मुक्तार शेख आदींच्या पथकाने केली.