भांगची विक्री करणारे दोघे गजाआड, एक फरार; ३ लाख ३० हजार रुपये किंमतीची भांग हस्तगत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भांगची विक्री करणा-या दोघांना पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले असून संशयितांचा एक साथीदार पसार झाला आहे. या दोघांकडून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ६०४ किलो ३०० गॅम वजनाची व ३ लाख ३० हजार रूपये किमतीची भांग हस्तगत केले आहे. पवन सुकदेव वाडेकर (२५ रा.म्हाडा कॉलनी,आडगाव शिवार) व ज्ञानेश्वर बाळू शेलार (२८ रा.वावरे लेन,शिवाजीरोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून गोविंद चंद्रकांत शेलार हा त्याचा साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे बाळासाहेब नांदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शालिमार परिसरातील वावरे लेन भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने बुधवारी (दि.२५) म्हसोबा मंदिर शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला असता संशयित भांग सदृष्य मादक पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगतांना मिळून आले. या ठिकाणाहून प्लॅस्टीकच्या गोणींमध्ये भरलेला सुमारे ६०४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा आणि ३ लाख ३० हजार १५३ रूपये किमतीचा भांग हा अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे करीत आहेत.
घरगुती गॅस अॅटोरिक्षात भरणा-या दोघांना पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चिंचबन भागात घरगुती गॅस अॅटोरिक्षात भरणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. रोहित अजय गायकवाड (१९ रा.मजूरवाडी,वाघाडी) व दिपक रमन्ना वर्धे (२३ रा.बोंबटी गल्ली,नागचौक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत सिलेंडरसह अॅटोरिक्षा जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचबन भागात उघड्यावर बेकायदा घरगुती गॅस भरून मिळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चिंचबन भागात छापा टाकला असता संशयित अॅटोरिक्षात गॅस भरतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून भरलेली व रिकामे गॅस सिलेंडर आणि अॅटोरिक्षा हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी अंमलदार संतोष कोरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.