बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ६८ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अशोका मार्ग परिसरातली कल्पतरूनगर येथे बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६८ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोने चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य मुकूंद जोशी (रा.ओमकार बंगला,कल्पतरू नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जोशी कुटूंबिय गेल्या सोमवारी (दि.२३) कामानिमित्त पुणे येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६८ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणारा तडिपार पोलिसांच्या जाळ्यात
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फुलेनगर भागात हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान सुरेश वाघ (२५ रा.गल्ली नं.६ शेषराव महाराज चौक फुलेनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. समाधान वाघ याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलिसांनी त्यास दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. शहर आणि जिह्यातून त्यास तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.२५) तो आपल्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फुलेनगर भागात सापळा लावून त्यास अटक केली. याप्रकरणी अंमलदार अंकुश काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक नांदुर्डीकर करीत आहेत.
जुगार खेळणा-या पाच जणांवर कारवाई; १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या पाच जुगारींवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना गजाआड केले आहे. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. शाम त्र्यंबक शिरसाठ (५३ रा.चव्हाण चाळ,अनुराधा टॉकीज समोर ना.रोड),तुषार बाबुराव ससाणे (३७ रा.खडकपुरा गल्ली सायखेडा ता.निफाड),रविंद्र नरहरी चिखले (४० रा.पाण्याच्या टाकीजवळ,सायखेडा ता.निफाड),योगेश बारकु झारखंडे (३५ रा.सोमवार बाजार,देवळाली गाव) व बबन दामू पवार (४१ रा.ओढागाव ता.जि.नाशिक) अशी संशयीत जुगारींची नावे आहेत. ओढा गावाती एका गायी म्हशीच्या गोठ्याजवळ काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२५) पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयिताच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १४ हजार २५० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी युनिटचे हवालदार गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार वाढवणे करीत आहेत.