पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या संशयित पोलिसांच्या ताब्यात; गावठी कट्यासह जीवंत काडतुसे हस्तगत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्यासह जीवंत काडतुसे असा सुमारे २५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करुन त्याला अटक केली आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय गणेश नाईकवडे (२५ रा.अश्विनी कॉलनी,सामनगावरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाचे स्वप्निल जुंद्रे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बुधवारी (दि.२५) रात्री एक सराईत गुन्हेगार देवळाली गावातील आठवडे बाजार भागात पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता. संशयित मनपा शाळा क्र.१२६ समोरील बाजार चौक मैदानावर येताच पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यात देशी बनावटीचा पिस्तूल आणि एक जीवंत काडतुसे मिळून आले असून तो सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी अंमलदार भगवान जाधव यांनी दिलेल्या तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.
हातातून मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवर रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर भरत बोरकर (३३ रा.कोकन भवन,कामटवाडारोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. बोरकर गेल्या रविवारी (दि.२२) सातपूर येथे गेले होते. सातपूर येथून ते त्र्यंबकरोडने पायी आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. सकाळ सर्कल ते आयटीआय दरम्यान ते मोबाईलवर बोलत घराकडे पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या हातातील सुमारे २० हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.