गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला; सव्वा चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडून चालकास अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही कारवाई करत टेम्पोसह गुटखा असा सुमारे सव्वा चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप श्रीकांत पांडे (३२ रा.रिंकी संकूल समोर उपेंद्रनगर) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. औद्योगीक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती त्यानुसार गुरूवारी (दि.२६) अंबड लिंकरोडवरील हॉटेल न्यू इंडियासमोर पोलिसांनी वाहन तपासणी केली असता संशयित मुद्देमालासह पोलिसांच्या हाती लागला. एक्स्लो पॉईंट कडून पपया नर्सरीच्या दिशेने जाणा-या महिंद्रा जितो या वाहनास अडवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. त्यात विविध प्रकारचा गुटखा,सुगंधी सुपारीचा समावेश आहे. संशयितास अटक करून पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला असून याप्रकरणी हवालदार गुलाब सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
…….
महागडे तीन मोबाईल चोरून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जुने नाशिक येथील दुधबाजार भागात घरात शिरून चोरट्यांनी महागडे तीन मोबाईल चोरून नेले. कुटुंबिय नमाज पठण करण्यासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी हे कृत्य केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम शकिल तांबोळी (रा.हेलबावडी मस्जीद समोर,दुधबाजार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तांबोळी यांचे कुटूंबिय बुधवारी (दि.२५) आपल्या घरासमोरील मस्जीदमध्ये नेहमी प्रमाणे नमाज पठण करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून चार्जींगला लावलेला अॅपल,सॅमसंग आणि नोकीया या कंपन्याचे सुमारे ५७ हजार रूपये किमतीचे तीन मोबाईल चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक ढेपने करीत आहेत.