भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या दोघा मुलांना मारहाण; खिशातील रोकड व मोबाईलही बळजबरीने काढून घेतले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या दोघा मुलांना मारहाण करुन खिशातील रोकड व मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा करणा-या विरुध्द पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळू पगारे असे मुलांना लुटणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम शामलाल पटेल (रा.दिंडोरीरोड) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. पटेल यांचा लहान भाऊ राज व कामगार अभिषेक हे दोघे गुरूवारी भाजीपाला विक्रीसाठी दिंडोरीरोड येथील मार्केट यार्डात आले होते. भाजीपाला विक्री करून ते घराकडे परतत असतांना संशयितांने दोघांना गाठले. यावेळी संशयिताने त्यांना कुठलेही कारण नसतांना दमदाटी करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत दोघांची अंगझडती घेत भाजीपाला विक्रीची चार हजाराची रोकड आणि मोबाईल असा सुमारे ९ हजार रूपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. यानंतर त्याने दहशत माजवित काळू पगारे नाम है मेरा असे म्हणत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
………..
जुगार खेळणा-या चौघांविरुध्द पोलिसांनी कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाईम ओपन नावाचा मटका जुगार खेळणा-या चौघांविरुध्द पोलिसांनी कारवाई केली आहे. वर्दळीच्या ठाकरे गल्ली भागात हे जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे साडे तीन हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन रविंद्र पवार (रा.काठे गल्ली),सलिम अब्दूल रहेमान पठाण (रा.पिंपळचौक,ठाकरे रोड),फैजल मेहमुद पठाण (रा.ठाकरेरोड) व सरवर तौफीक शेख (रा.खडकाळी) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. ठाकरे गल्लीत काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी संदर्भ हॉस्पिटल मागील जयराम ग्लास बाजूच्या मोकळया जागेत छापा मारला असता संशयित टाईम ओपन नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ३ हजार १३० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक संदिप शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक काठे करीत आहेत.