नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सराफी दुकान आणि बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी जयभवानी रोड भागात बुधवारी झाली असून त्यात चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड चोरुन नेले. या चोरीप्रकरणी अरूण कृष्णा कपोते (रा.जयभवानी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपोते यांचे परिसरातील शकूंतला पेट्रोल पंप भागातील भवानी अर्पा.मध्ये परंपरा ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री या दुकानासह नंदनवन कॉलनीतील सुनिता सुरेश बडवे यांच्या बंगल्याचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. सराफी दुकानातील शोकेशमध्ये विक्रीसाठी ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व गल्यातील रोकड तर बंगल्यातील चांदीची फुलदाणी आणि रोकड असा सुमारे २ लाख १८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.