आर्थिक व्यवहारातून दुचाकीस्वार तरूणीस भररस्त्यात बेदम मारहाण, विनयभंग
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळानाका भागात आर्थिक व्यवहारातून दुचाकीस्वार तरूणीस भररस्त्यात बेदम मारहाण करीत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली.याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझर रशिद खान (रा.वडाळानाका,द्वारका) असे संशयिताचे नाव आहे. जुने नाशिक भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडित तरूणी व संशयित एकमेकांचे परिचीत असून, त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. बुधवारी (दि.१८) रात्री युवती आपल्या काकूस जेवणाचा डबा देण्यासाठी खोडेनगर भागात दुचाकीवर जात होती. वडाळानाका भागातून दुचाकीवर प्रवास करीत असतांना तिला अझर खान दिसला. त्यामुळे तिने गाडी रस्त्यावर थांबवून त्याच्याकडे हात उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी केली असता ही घटना घडली. भररस्त्यात पैश्यांची मागणी केल्याने संतप्त अझर खान याने युवतीस शिवीगाळ व मारहाण करीत विनयभंग केला. अचानक संशयिताने हल्ला चढविल्याने भेदरलेल्या पीडितेने आरडाओरड केली असता संशयिताने पळ काढला असून, अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत.
३९ वर्षीय विवाहीतेची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३९ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना अमरधामरोड भागात घडली. मिंतू संतू सामंत असे मृत विवाहीतेचे नाव आहे. सामंत यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिंतू सामंत या विवाहीतेने बुधवारी (दि.१८) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही बाब निदर्शनास येताच पती संतू सामंत यांनी त्याना तातडीने आडगाव नाका येथील सदगुरू हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गुरूवारी उपचार सुरू असतांना डॉ. कृष्णा यादव यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.