नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरनाका भागात चायनिज खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यावर अवैधपणे मद्यविक्री करणा-याविरुध्द पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे अडिच हजाराचा दारू साठा जप्त करुन आडगाव पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल सुरेश कापसे (४१ रा.कापसे गल्ली गणपतनगर,नांदूरनाका) असे मद्यविक्रेत्याचे नाव आहे. संशयित कापसे याचा नांदूनाका भागातील शेतकरी ढाबा या हॉटेल समोर चायनिज खाद्यविक्रीचा व्यवसाय आहे. संशयित ग्राहकांना बेकायदा मद्य उपलब्ध करून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१८) त्याच्या हातगाडीवर छापा टाकला असता सुमारे २ हजार ४५० रूपये किमतीचा प्रिन्स नावाच्या देशी दारूचा साठा चायनिज गाडीत मिळून आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सचिन बाहिकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सावंत करीत आहेत.