नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहीपूल परिसरात वसुलीसह वर्चस्व वादातून दोन गटांत झालेल्या सशस्त्र दंगल प्रकरणी पोलिसांनी चौदा संशयितांना अटक करुन त्यांची घटनास्थ व परिसरात मंगळवारी दुपारी धिंड काढली. या घटनेत दुकानांसह वाहनांची तोडफोड करुन टोळक्यांनी एकाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत दोन्ही टोळ्यांवर दंगलीसह खूनाचा प्रयत्न प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसूल तपास करुन संशयिताला गजाआड केले. त्यानंतर आज भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार आणि दिलीप ठाकूर यांच्या पथकाने दुपारी बारा वाजता संशयितांना घटनास्थळी नेत पंचनामा केला. तिथे हत्यारांचा वापर, दमदाटी, हाणामा-या, तोडफोड केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या गराडयात दोन्ही टोळक्यांना आणल्यावर परिसरातील दुकानदार व नागरिकांची गर्दी झाली.
या घटनेत पोलिसांनी ऋषिकेश किरण खैरे (वय २६, रा. आसराची वेस), सुशिल उर्फ हेमराज उर्फ यमराज मनोहर गायकवाड (२८, रा. मधुबन कॉलनी) या मुख्य संशयितांसह नरेश हिरालाल राठोड (२९, रा. खुटवडनगर), लवकुश दयाल यादव (२६, रा. अशोकस्तंभ), चेतन पांडुरंग खैरणार (२५, रा. काझीगढी), बाळा बाबुलाल प्रसाद (२५, रा. भद्रकाली), गौरव उर्फ गणेश राजेंद्र खैरे (२४, रा. आसराची वेस), ओम सतीश खैरे (१९, रा. पाटील गल्ली), शुभम संतोष दाते (१९, रा. हिरावाडी), प्रवीण नरेश बोराडे (१९, रा. चित्रघंटा), ओमकार कुंदन जगताप (२०, रा. पाटील गल्ली), शुभम जगन्नाथ जायभावे (१९, रा. पाटील गल्ली), राकेश अनिल जगताप (२७, रा. आसराची वेस) आणि लक्ष्मण काशिनाथ साबळे (२७, रा. कुंभारवाडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे.