नाशिक – शिलापूर शिवारात नाल्याच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांच्या मागे लपून हा मुलगा गेला होता. त्यानंतर ही दुदैर्वी घटना घडली. कृष्णा दीपक गांगुर्डे (रा.मराठी शाळे मागे,आदिवासी वस्ती शिलापूर) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार शिलापूर येथील दीपक गांगुर्डे हे मंगळवारी सकाळी पत्नीसोबत शेतात जनावरांना चारा घेण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा कृष्णा हा त्यांच्या मागे जात होता. मुलगा मागे येत आहे याची कल्पना आई-वडिलांना नव्हती. कृष्णा दत्तमंदिराजवळील नाल्याजवळ आला. नाला ओलांडत असतांना शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरल्याने तोल जाऊन तो नाल्यात पडला. जवळच असलेल्या मोरीत तो अडकला. मुलगा पाण्यात पडल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. नागरीकांनी त्यास बाहेर काढत घटनेची माहिती आई वडिलांना दिली. वडिल गांगुर्डे यांनी त्यास तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.