नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतजमिनीच्या वादातून सावत्र आईला मदत केली म्हणून सख्या लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची हत्या करीत अपघाताचा बनाव केल्याचे समोर आले आहे. या घटनेत काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मखमलाबाद शिवारातील गंगापूर रोड कॅनॉल मध्ये दुचाकीसह पडून युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करीत हा खून करण्यात आला होता. या अपघाताबाबत नातलगांनी पहिल्यापासून घातपात असल्याचा आरोप केल्याने पोलिसांनी तपास केला असता खूनाचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित दीपक साहेबराव कराड (३५ रा. तेजप्रतीक सोसायटी मखमलाबाद नाका, पंचवटी) याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला खून करण्यासाठी त्याला कोणी मदत केली का याचाही पोलीस शोध घेत आहे.
पाटात मृतदेह मिळाला
गुरुवारी ज्ञानेश्वर हा दुचाकीसह गायकवाड मळ्यासमोरील पाटात पडलेला आढळून आला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन मयत झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातलगांनी व्यक्त केल्याने पोलिसानी त्या दिशेने तपास सुरू केला होता.
हा होता शेतजमिनीचा वाद
मयत ज्ञानेश्वर कराड यांचे वडील साहेबराव यांचे दोन लग्न झाले असून त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी तर दुसऱ्या पत्नीपासून ज्ञानेश्वर आणि दीपक असे दोन मुले झाले होते. यामध्ये साहेबराव यांनी १०२ गुंठे जमीन मखमलाबाद पाटाजवळ पहिल्या पत्नीच्या नावाने खरेदी केली होती. यातील सहा गुंठे जमीन विकून दिपकला फ्लॅट खरेदी करून दिला होता तर ४० गुंठे जमीन दुसऱ्या पत्नीच्या नावावर करून देत ५२ गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावावर ठेवली होती. मात्र, कोरोना काळात शासनाने स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत दिल्याने दिपकने आपल्या सावत्र आईच्या अडाणीपणाचा फायदा घेत ५२ गुंठे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. यामध्ये न्यायालयात दावा दाखल करून ज्ञानेश्वरने आपल्या सावत्र आईला मदत करीत जमीन परत मिळवून दिली होती. आपल्या हाती आलेला घास ज्ञानेश्वरने हिसकावून नेल्याचा राग दिपकच्या डोक्यात होता.
हत्या करुन अपघाताचा बनाव
दीपकने मयत ज्ञानेश्वर याला वेळोवेळी आमच्यात पडू नको नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी ज्ञानेश्वर यांच्या पत्नी समोर दिली होती. याचाच राग डोक्यात ठेवून संशयित दीपक साहेबराव कराड याने गुरुवार१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर यांना मारून त्यांची हत्या करीत अपघाताचा बनाव केला असल्याची फिर्याद मयताची पत्नी वंदना ज्ञानेश्वर कराड हिने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिली आहे.