नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॉयलान मांजा विक्री करणा-या दोघांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून ३५ हजार रूपये किमतीचा मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई भद्रकालीतील पंचशिलनगर भागात करण्यात आली. सुरज आसाराम उमप (रा.जीपीओ रोड पंचशिलनगर) हा युवक रॉयल हेरिटेज हॉटेल भागात दुचाकीवर नॉयलॉन मांजाची विक्री करीत होता. संशयिताच्या ताब्यात सुमारे ३२ हजार ४५० रूपये किमतीचे १३ नग नॉयलॉन मांजाचे गट्टू हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी अंमलदार जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक म्हसदे करीत आहेत. तर दुसरी कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली आहे. पराग राजेंद्र गायधनी (३१ रा.पाटीदार भवन समोर,विद्यानगरी ना.रोड) यास मांजा विक्री करतांना रंगेहात पकडले. संशयित दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात नॉयलान मांजा विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे २ हजार ८०० रूपये किमतीचे चार गट्टू हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी युनिटचे कर्मचारी सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम,मांजा मनाई आदेश उलंघन व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.