नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरगुती गॅसचा अवैध व्यवसाय करणा-यावर पोलिसांनी छापा टाकत एक रिक्षा, तीन गॅसटाक्या, दोन मोटर आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असे साहित्य जप्त केले. या छाप्यात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पंचवटी परिसरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलजवळील राजवाडा येथे अर्धवट बांधकाम बंद पडलेल्या इमारतीत वाहनांमध्ये घरगुती गॅस अवैध पद्धतीने भरून देण्याचे काम सुरू असताना हा छापा टाकला. गेल्या अनेक दिवसांपासून येथे हा अवैध व्यवसाय सुरु होता. या अड्डयाची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी दुपारी हा छापा टाकला. यात एक रिक्षा क्रमांक एम.एच.१५-झेड-८२५३ सह भारत पेट्रोलियम कंपनीच्या तीन टाक्या, दोन मोटर आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे असे साहित्य जप्त करण्यात आले. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.