रिक्षाप्रवासात महिलेची पर्स मधील पाकिट चोरीला; सहप्रवासी महिलेनेच केली चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -दत्तमंदिर स्टॉप ते नाशिकरोड बस स्टॅण्ड पर्यंतच्या रिक्षाप्रवासात महिलेची पर्स मधील पाकिट सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी चोरून नेल्याची घटना घडली. पाकिटात नव्याने घडलेले चांदीचे देव व सोन्याचे लॉकिट असा ऐवज होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना जगन्नाथ भावसार (५७ मुळ रा.नायगावरोड सिन्नर,हल्ली नवी मुंबई) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भावसार या आपल्या मुळगावी आल्या होत्या. मंगळवारी (दि.१०) मुंबई येथील परतीच्या प्रवासास लागण्यापूर्वी त्या गावाहून आणलेले देव उजळण्यासाठी दत्तमंदिर येथील सराफी पेढीत गेल्या असता ही घटना घडली. देव आणि सुमारे दीड तोळयाचे लॉकेट खरेदी करून त्या नाशिकरोड येथे रिक्षाने गेल्या असता ही चोरी झाली. रिक्षातून प्रवास करतांना दोन महिला त्यांच्या पूर्वीच रिक्षातून प्रवास करीत होत्या. संबधीत महिलांनी बोलण्यात गुंतवून भावसार यांच्या पर्स मधील दागिणे असलेले पाकिट हातोहात लांबविले. ही बाब बसस्थानकात पोहल्यानंतर निदर्शनास आली. मात्र तत्पूर्वीच भामट्या महिला रिक्षातून उतरून पसार झाल्या होत्या. अधिक तपास हवालदार मंगेश दराडे करीत आहेत.
……..
पिंपळाच्या झाडाखाली जुगार खेळणा-या पाच जणांच्या पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संत कबीर नगर येथील पिंपळाच्या झाडाखाली जुगार खेळणा-या पाच जणांच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे ३ हजार १५० रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक उर्फ अशरोबा रेशमाजी साळवे, पंडीत भिका बदादे (रा. दोघे संत कबीरनगर), संदिप प्रल्हाद शेळके (रा.धुम्रवर्ण सोसा. सावरकरनगर), राजेंद्र प्रभाकर मराठे (रा.अशोक नगर,सातपूर) व रामदास बाळकृष्ण मानकर (रा.मधुरवाडी,वाघाडी) अशी अटक करून सोडण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. संत कबीर नगर येथील पिंपळाच्या झाडाखाली राजरोसपणे उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता संशयित कल्याण टाईम नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आला. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे ३ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयितांना नोटीस देवून सोडण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस नाईक मोहिते करीत आहेत.
………..