एटीएम कार्डची आदला बदल करुन बँक खात्यातील १९ हजार रूपये परस्पर काढून घेतले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बोधले नगर भागात एटीएम कार्डची आदला बदल करुन एकाने बँक खात्यातील १९ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याची घटना घडली. या फसवणूक प्रकरणी मनाली प्रमोद दोंदे (रा.सावतामाळी स्विटस मागे,जेलरोड) या युवतीने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोंदे या मंगळवारी (दि.१०) आपल्या वडिलांचे एटीएम कार्ड घेवून बोधलेनगर भागात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. एसबीआय एटीएम बुथमध्ये त्या पैसे काढत असतांना ही घटना घडली. भामट्यांनी मदतीचा बहाणा करीत युवतीच्या हातातील कार्डची आदलाबदल केली. तत्पूर्वी युवती पैसे काढत असतांना भामट्यांनी पिन नंबर चोरून पाहून हा गंडा घातला. ही बाब तरूणी घरी गेली असता उघडकीस आली. मात्र तत्पुर्वीच भामट्यांनी अन्य एटीएममध्ये जावून तरूणाच्या वडिलांचे एटीएम कार्ड वापरून १९ हजार परस्पर काढून घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
दोघा मित्रांची वाट अडवित टोळक्याने त्यांना बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरनाका भागात दोघा मित्रांची वाट अडवित टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे मित्र जखमी झाले आहे. या मारहाणप्रकरणी अमोल अनिल सोनवणे (२७ रा.जनार्दन नगर,नांदूरनाका) या युवकाने तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कुणाल गाडे व त्याचे तीन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. सोनवणे व अल्ताफ शेख हे दोघे मित्र गेल्या रविवारी (दि.८) सकाळच्या सुमारास नांदूरनाका भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. संशयित व त्याच्या तीन साथीदारांनी दोघा मित्रांची वाट अडवित दोघांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रसंगी संतप्त गाडे याने लोखंडी रॉडने तर उर्वरीत साथिदारांनी दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास हवालदार सावंत करीत आहेत.