नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फायनान्स कंपनीकडून परस्पर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुगल पे मिनीस्पिकर देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून एका भामट्याने हा गंडा घातला आहे. व्यावसायीकाने हप्ता न मिळाल्याने वसूली अधिका-यांनी व्यावसायीकाचे घर गाठल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मिनीस्पिकर पुरविणा-या संशयिताविरोधा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलिक अमिन मोहम्मद हसन इफेदी (२१ रा.जोहरा अपा.अशोकनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी राजेश राजपाल कुसवाह (रा.हेडगेवारनगर,त्रिमुर्ती चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुसवाह यांचे हेडगेवारनगर भागात अंकित प्रोव्हीजन व जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. गेल्या १ नोव्हेंबर रोजी ते नेहमी प्रमाणे आपला व्यवसाय सांभाळत असतांना संशयिताने त्यांना गाठले. यावेळी गुगल व फोन पे सुविधेसाठी मिनी स्पिकर पुरविण्याचे काम बघत असल्याचे सांगून त्याने कुशावह यांच्या कागदपत्राचे मोबाईल मध्ये फोटो काढले. या कागदपत्राच्या आधारे संशयिताने कुशावह यांच्या नावे होम क्रेडिट फायनान्स या कंपनीतून परस्पर ४४ हजार रूपयांचे कर्ज काढून रोकड लांबविली. महिना उलटूनही कुशावह यांच्याकडून फायनान्स कंपनीला हप्त्याची रक्कम न मिळाल्याने वसूली प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. संशयिताने याप्रकारे अनेकांना गंडविल्याचे बोलले जात असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.