अज्ञात वाहनाच्या धडक दिल्याने स्मार्ट सिटी कंपनीच्या कर्मचा-याचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत अज्ञात वाहनाच्या धडक दिल्याने स्मार्ट सिटी कंपनीच्या कर्मचा-याचा मृत्यू झाला. नामदेव रामदास चौधरी (३९ रा.चाणक्यपूरी सोसा.म्हसरूळ मखमलाबाद लिंकरोड) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौधरी स्मार्ट सिटी कंपनीत चालक पदावर कार्यरत होते. रविवारी (दि.८) सुट्टी असल्याने ते नातेवाईकांना भेटण्यासाठी सातपूर भागात गेले होते. रात्री दुचाकीवर घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. औद्योगीक वसाहतीतून ते परतीचा प्रवास करीत असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात चौधरी गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यांना संकल्प हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून सोमवारी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक केदार करीत आहेत.
गळफास घेत आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४४ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना कामटवाडा भागात घडली. खंडू रंगनाथ कसबे (रा.नंदलाल निवास, धन्वंतरी मेडिकल कॉलेज मागे) असे मृत इसमाचे नाव आहे. कसबे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कसबे यांनी सोमवारी (दि.९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास बेल्ट बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भाऊ सागर कसबे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.