नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्राहकांकडून ऑर्डरचा अॅडव्हान्स घेत कंपनी कर्मचा-याने लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑर्डरचे पैसे अदा करूनही माल मिळत नसल्याने ग्राहकांनी कंपनीत धाव घेतल्याने हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी सचिन सुरेंद्र शर्मा (रा.महात्मानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रितेश सुरेशराव देशमुख (३५) असे कंपनीच्या पैश्याचा अपहार करणा-या संशयित कर्मचा-याचे नाव आहे. संशयित देशमुख हा सुप्रिम इक्यूमेंट प्रा.लि.नाईस एरिया सातपूर या कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असून तो ग्राहकांची ऑर्डर घेवून माल पुरविण्याचे काम बघत होता. २९ ऑक्टोबर २०२१ ते १ ऑक्टोबर २०२२ या वर्षभराच्या काळात त्याने विविध ठिकाणच्या ग्राहकांकडून सुमारे ५ लाख ९ हजार ९०३ रूपये ऑर्डरच्या बहाण्याने स्विकारले. मात्र ही रक्कम कंपनीत जमा न करता त्याने परस्पर स्व:ताच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. पैसे अदा करूनही ऑर्डर प्रमाणे माल न मिळाल्याने ग्राहकांनी थेट कंपनीत धाव घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला असून कंपनीचे शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी संशयिताविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.