नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे सहा लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी आडगाव, इंदिरानगर व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील फडोळ मळा भागात घडली. प्रशांत नारायण कान्हे (रा.सोहम हाईटस,फडोळ मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. कान्हे कुटूंबिय सोमवारी (दि.९) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा कान्हे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे तीन लाख रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत. दुसरी घटना इंदिरानगर भागात घडली. प्रांजल रूपचंद चौधरी (रा.चामुंडा निवास,बजरंग सोसा. राजसारथी पाठीमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौधरी कुटूंबिय दि.७ ते ९ जानेवारी दरम्यान बाहेर गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली एक लाखाची रोकड,सोन्याचे दागिणे व स्पोर्टस शुज असा सुमारे १ लाख २५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत. तिसरी घटना घरफोडी आडगाव शिवारात झाली. पोपट लोटन महिरे (रा.शिवालय रो हाऊस,रूख्मिनी लॉन्स मागे,चौंडेश्वरीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महिरे कुटूंबिय गेल्या मंगळवारी (दि.३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्याच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली तीन हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख १२ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.