नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नायलॉन मांजा विक्री करणा-या सहा जणांवर तडीपारीची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा १० जणांना तडीपार केले आहे. त्यामुळे तडीपारांची संख्या सोळा झाली आहे. नायलॉन मांजा विक्रीला मनाई आदेश असतानाही त्याची सर्रासपणे विक्री होत आहे. हे कारवायांच्या माध्यमातून समोर येत आहे.
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अनेकांना शहरातील वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून १०, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून २ जणांवर कारवाई झाली आहे. या सर्वांवर नायलॉन मांजा विक्री विरोधी गुन्ह्यात १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी याअगोदरच नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत नायलॉन मांजा वापरास सक्त मनाईचे आदेश जारी केले होते. तरी सुध्दा सर्रास नायलॉन मांजा विक्रीचा होत होती. त्यामुळे पोलिसांनी या विक्रेत्यांना तडीपार करण्याचे सत्र सुरु केले. त्यामुळे या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. संक्रांत सण अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहे.