नाशिक : देवळाली गावात घरबांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने संतप्त पतीने आपल्या पत्नीच्या गळयावर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली. या घटनेत महिलेच्या गळयावर व हातावर वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. राजू निवृत्ती जाधव (५० रा.नागसेननगर,वडाळानाका) असे पत्नीवर चाकू हल्ला करणा-या संशयित पतीचे नाव असून त्याच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमन जाधव (४० रा.सदर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. सुमन जाधव या सोमवारी (दि.११) भाची सोनाली संदिप कदम यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माहेरी आई ताराबाई लोंढे (रा.गांधीधाम,देवळाली गाव) यांच्या घरी गेली असता ही घटना घडली. कदम दांम्पत्याची सायंकाळच्या सुमारास अॅनेव्हसरी कार्यक्रम सुरू असतांना संशयित तिथे आला. त्याने आपल्या पत्नीस बाजूला घेत घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यावरून वाद घातला. यावेळी सुमन जाधव यांनी पैसे आणण्यास नकार दिल्याने संतप्त संशयित पतीने शिवीगाळ व दमदाटी करीत सोबत आणलेल्या चाकूने त्यांच्या गळय़ावर जीवे मारण्याच्या उद्देशाने सपासप वार केले. या घटनेत त्याच्या गळयास आणि हातास मोठी दुखापत झाली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी करीत आहेत.