तरूणाच्या डोक्यात पिस्तूलचा घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन जण गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोड भागात तरूणाच्या डोक्यात पिस्तूलचा घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटनेत पोलिसांनी दोन जणांना गजाआड केले आहे. या घटनेत तरूण जखमी झाला असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिकेश गणेश सोलंकी (२४ रा.बेलदारवाडी, दिंडोरीरोड) व रोहित खंडू गांगुर्डे (२३ रा.मंजूबाबा गल्ली,फुलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश देविदास पवार (२३ रा. मांडवे सोसा.प्रभातनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संशयित व जखमीचा भाऊ मनोज पवार यांच्यात वाद झाला होता. गुरूवारी (दि.५) सायंकाळी दोघे भाऊ म्हसरूळ गावातील बुध्द विहार भागात गेले असता ही घटना घडली. या ठिकाणी भेटलेल्या संशयितांना राजेश पवार याने भावाशी झालेल्या वादाबाबत समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतप्त संशयितानी दोघा भावांनी तुम्हाला उद्या बघतो असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी संशयित रोहित गांगुर्डे याने जर्किनच्या खिशातून पिस्तूल सारखी वस्तू काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने राजेश पवार याच्या डोक्यात घाव घातला. या घटनेत राजेश जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
३४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना हिरावाडीरोडवरील त्रिमुर्तीनगर भागात घडली. विनोद राजेंद्र रायसाकडे असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. रायसाकडे यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. रायसाकडे यांनी शुक्रवारी (दि.६) आपल्या राहत्या घरातील हॉल मध्ये पंख्याच्या कडीस दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सुरज सैंदाणे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गोसावी करीत आहेत.