नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातांमध्ये तीन जण जखमी झाले. पहिला अपघात वडाळा पाथर्डी मार्गावरील एकता कॉलनी भागात झाला. विवेक मधुकर जोशी (५९ रा.श्रध्दाविहार कॉलनी,वडाळा पाथर्डी रोड) हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.१) मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. एकता कॉलनीच्या दिशेने ते पायी जात असतांना विश्वास बँके समोर पाठीमागून येणा-या दुचाकीने एमएच १५ सीई ४५२० त्यांना धडक दिली. चालकाने आपल्या खिशातील मोबाईल काढण्याच्या नादात जोशी यांना धडक दिली. याप्रकरणी मुलगा रोहन जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय दशरथ पोरजे (रा.वडनेरगेट) या दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत. दुसरी घटना तपोवन रोडवर झाली. शिंदे येथील रमेश साहेबराव दिघे व पत्नी संगिता दिघे हे दांम्पत्य गेल्या २२ डिसेंबर रोजी कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास तपोवनरोडने ते आपल्या दुचाकीवर एमएच १५ बीएम ९३२९ परतीच्या प्रवासास लागले असता हा अपघात झाला होता. दिघे दांम्पत्य डबलसिट जयशंकर गार्डन समोरून नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०१ एआर ९९६० याकारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दांम्पत्य जखमी झाले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अलिफिया हुजेफा जरीवाला (रा.काठेगल्ली) या कारचालकाविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक चकोर करीत आहेत.