नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राणेनगर परिसरातील महामार्गावरील उड्डाणपुलावर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत बालक ठार झाल्याची घटना घडली. आशिष सुनिल धोत्रे (रा.महाकाली चौक,सिडको) असे मृत बालकाचे नाव आहे. आशिष आपल्या आई सोबत महामार्ग ओलांडत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष गुरूवारी (दि.५) आपल्या आई समवेत चेतनानगर भागात गेला होता. मायलेक घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. आईचा हात धरून आशिष हॉटेल समोरील उड्डाणपूल ओलांडत असतांना हातातील कॅरीबॅग पडल्याने आशिष हात सोडून बॅग उचलत असतांना द्वारकाकडून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणा-या अज्ञात चारचाकीने त्यास धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आई ज्योती धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.