नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या भांडणाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नाशिकरोड परिसरातील सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनी परिसरात घडली. या हाणामारीत तलवारी, कोयते, चाकू वापर करुन रस्त्यावरील वाहनांची तोडफोडही करण्यात आली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अंकुश जाधव व प्रवीण महाडिक यांनी परस्पराविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.
या घटनेत अंकुश शांताराम जाधव यानी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घरी जात असतांना निकेश जाधव, जितेश जाधव, शुभम कोतवाल, योगेश अहिरे आदींनी रस्त्यात अडवून मागील भांडणाची कुरापत काढली. त्यानंतर कुणालच्या पोटावर सुरुवातीला चॉपरने वार करून तलवार व कोयत्याने हातावर डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. तर प्रवीण महादेव महाडिक यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घरात घुसून टोळक्याने मित्र कुणाल याला मारहाण करुन सामानांची तोडफोड केली. शकुंतला महाडिक यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. जखमी झालेल्या शकुंतला महाडिक यांची मुलगी पूजा ही उपचारासाठी दवाखान्यात जात असताना तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच शुभम कोतवाल व जितेश जाधव यांच्या घरावर हल्ला करून नुकसान केले. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गणेश नायदे, पोलीस उपनिरीक्षक काकड, हवालदार रामदास गायकवाड करीत आहे.